मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेच्या अर्जास आता फक्त 8 तासांमध्ये मंजुरी मिळणार? ती कशी चला तर मग जाणून घेऊया. राज्यातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य आता जास्त वेगात मिळणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाची अद्यावत ऑनलाईन प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन 8 तासांमध्ये पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी सलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर करण्यात येणार आहे. यामुळे रुग्णाला कोणत्याही प्रकारचा अर्ज भरावा लागणार नाही व उपचार प्रक्रियेला अधिक गती मिळणार आहे.
या प्रणालीचे उद्घाटन येत्या काही दिवसात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष यांच्याकडून देण्यात आलेली आहे. मागील काही वर्षापासून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षामध्ये नाविन्यपूर्ण बदल करण्याचे काम सुरू होते. त्यातीलच एक भाग मुख्यमंत्री सहाय्यता निधीची ही नवीन ऑनलाईन प्रणाली आहे. रुग्णाने रुग्णालयामध्ये आवश्यकतेनुसार सर्व कागदपत्रे दिल्यानंतर रुग्णालय प्रशासन त्याचा अर्ज मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवणार आहे. त्या ठिकाणी नियमानुसार सर्व कागदपत्रे असल्यास अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन 8 तासांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्ण व त्याच्या नातेवाईकाला मोठा दिलासा मिळणार आहे.
तसेच मागील आर्थिक वर्षात 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत राज्यातील तब्बल 40 हजार 776 रुग्णांना 333 कोटी 6 लाख 81 हजार 500 रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आलेली आहे. ही ऑनलाईन प्रणाली रुग्णांना वेळेत उपचार मिळावा यासाठी विकसित करण्यात आलेली आहे. आता अर्ज मंजुरीची प्रक्रिया या प्रणालीमुळे जलद होणार आहे. तसेच यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवीन प्रणालीचे उद्घाटन लवकरच होणार आहे. त्यानंतर राज्यभरात ती प्रभावीपणे राबवली जाणार आहे. अधिक माहितीसाठी गरजू रुग्णालयांनी 1800 123 2211 या टोल फ्री क्रमांकशी संपर्क साधावा.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

