महावितरणने दाखल केलेल्या वीज दर निश्चितीच्या प्रस्तावावरती वीज नियामक आयोगाने आदेश देत पुढील पाच वर्षासाठी वीज दरात कपात केलेली आहे. त्यानुसार 1 एप्रिल पासून 1 ते 100 युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना आता सात रुपये 31 पैसे ऐवजी 7 रुपये 10 पैसे प्रति युनिट दराने वीज बिल येणार आहे. पुढील वर्गवारीला काही प्रमाणात कपात असून, यंदाच्या वीज दर निश्चितेमध्ये वाढ नाही हाच काय तो दिलासा ग्राहकांना आहे. महावितरणच्या 2025-26 ते 2029-30 या पाच आर्थिक वर्षांच्या बहुवार्षिक वीज दर याचिकेवर आयोगाने आदेश दिला आहे. त्यानुसार, घरगुती, औद्योगिक, वाणिज्य ग्राहकांसाठीचे दर 2030 पर्यंत टप्प्याटप्प्याने दरवर्षी कमी होणार आहेत.
गेल्यावर्षी मार्च अखेरीस आयोगाने एक आदेश दिला होता. त्या आदेशाला स्थगिती देण्यात आली होती. महावितरणच्या पुनर्विचार याचिकेनुसार आयोगाने जून 2025 मध्ये आदेश दिला होता. उद्योगांना व व्यावसायिक ग्राहकांना सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीतील वीज वापरासाठीची टीओडी सवलत सुरूच राहणार आहे. एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात 15 टक्के तर ऑक्टोबर ते मार्च महिन्यात 25% सवलत या ग्राहकांना मिळणार आहे. स्मार्ट मीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना सकाळी 9 ते सायंकाळी 5 या काळात वीज वापराकरिता प्रति युनिट 80 पैसे सवलत मिळणार होती. आता 85 पैसे प्रति युनिट इतकी सवलत असणार आहे. उच्च दाब औद्योगिक ग्राहकांसाठीचा दर 10 रुपये 78 पैसे यावरून कमी होऊन 10 रुपये 71 पैसे इतका होणार आहे. घराच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवणाऱ्या ग्राहकांच्या सवलती कायम राहणार आहेत.
| युनिट वापर | जुने दर (रु/युनिट) | नवे दर (रु./युनिट) (1 एप्रिलपासून) |
| 1-100 | 7.31 | 7.10 |
| 101-300 | 13.17 | 12.94 |
| 301-500 | 17.56 | 17.35 |
| 500 पेक्षा जास्त | 19.15 | 19.14 |
महिना 100 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी पाच वर्षात 26 टक्के कपात आहे. एकूण घरगुती वीज ग्राहकांमध्ये या गटातील ग्राहकांचे प्रमाण 70 टक्के आहे. 100 ते 300 युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठीच्या विजदरातही पाच वर्षात पाच टक्के कपात आहे. उच्चदाब व लघुदाब विद्युत वाहन चार्जिंग स्टेशनसाठी प्रति युनिट 9 रुपये 50 पैसे इतका दर असणार आहे. 2030 पर्यंत हा दर जवळजवळ स्थिर राहणार असल्याने विद्युत वाहनांच्या वापराला प्रोत्साहन मिळणार आहे.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

