शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांपैकी एक असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबासाठी शासनाने महत्त्वाचा त्याचबरोबर दिलासादायक निर्णय घेतलेला आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमांतर्गत समावेश न झालेल्या लाभार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेसाठी तब्बल 12 कोटी 15 लाख 60 हजार 962 रुपयांचा निधी मंजूर करून देण्यात आलेला आहे. पुरवठा विभागाने या निधीस मान्यता दिलेली आहे. जिल्ह्यातील 1 लाख 97 हजार 60 लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम थेट डीबीटीद्वारे जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी कुटुंबांना आता तातडीचा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
प्रति लाभार्थी 170 रुपयांची मदत-
या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अन्नधानयान्याऐवजी थेट रोख स्वरूपात मदत देण्यात येणार आहे. सुरुवातीला जानेवारी 2023 पासून प्रति लाभार्थी 150 रुपये देण्यात येत होते परंतु 20 जून 2024 रोजीच्या परिपत्रकानुसार या रकमेत वाढ करण्यात आलेली आहे व दरमहा 170 रुपये दिले जात आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना थोडाफार आर्थिक आधार मिळत आहे.
जिल्ह्यातील लाभार्थ्यांची संख्या-
बुलढाणा जिल्ह्यात या योजनेच्या माध्यमातून 54,073 केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांची नोंद आहे. या कुटुंबांमधील एकूण लाभार्थ्यांची संख्या 1 लाख 97 हजार 60 इतकी आहे. या सर्वांना मिळून मंजूर निधी वितरित करण्यात येणार आहे. निधी वितरणाची प्रक्रिया जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत सुरू केली जाणार आहे.
‘धान्य बंद, पैसे सुरू’ धोरण-
पूर्व विदर्भ व मराठवाड्यातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांना भारतीय अन्न महामंडळामार्फत दोन रुपये किलो तांदूळ व तीन रुपये किलो गहू या दराने धान्य देण्यात येत होते. परंतु हा पुरवठा बंद झाल्यानंतर शासनाने धोरणात बदल करत धान्याऐवजी थेट रोख मदत देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार आता लाभार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्यात येते. त्यामुळे शेतकरी कुटुंबांना त्यांच्या गरजेनुसार खर्च करण्याची मुभा मिळाली आहे.
विलंबामुळे नाराजी, आता दिलासा-
मागील आर्थिक वर्षात या योजनेचा निधी वेळेवर न मिळाल्याने अनेक लाभार्थी नाराजी व्यक्त करत होते. परंतु यंदा निधी मंजूर झाल्याने आता लवकरच खात्यात पैसे जमा होणार असल्याने शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे व मंजूर निधीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील हजारो शेतकरी कुटुंबांना आर्थिक आधार मिळणार आहे. त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी यामुळे मदत मिळणार आहे.
नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

