शेतकऱ्यांनी पुरंदर विमानतळासाठीच्या जमीन मोजणीस संमती दिल्यानंतर आता पुढील मोजणीच्या प्रक्रियेला शुक्रवारपासून(ता.26) सुरुवात करण्यात आलेली आहे. पहिल्याच दिवशी तालुक्यातील मुंजवडी, खानवडी, एखतपूर या तीन गावांमधील सुमारे पन्नास हेक्टर जमिनीच्या मोजणीची प्रक्रिया शांततेत पूर्ण झालेली आहे. सातही गावांतील मोजणीसाठी पाच पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे व ही प्रक्रिया पुढील 25 दिवस चालणार आहे. मोजणी प्रक्रिया करत असताना ड्रोनचाही वापर केला जाणारा आहे.
या जमिनींची मोजणी करण्यासाठी या अगोदर एप्रिल महिन्यात जिल्हा प्रशासनाने भूमी अभिलेख विभागाकडे शुल्कही भरला होता. त्यानंतर प्रशासनाने पोलिसांच्या उपस्थितीमध्ये ड्रोन सर्वे करण्यास सुरुवात केली होती. परंतु ड्रोन सर्व्हेला शेतकरी घाबरु लागले होते व त्यातून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर जमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध असल्याचे दिसून आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने त्यावेळी नरमाईची भूमिका घेऊन ड्रोन सर्वेला स्थगिती दिली.
पुरंदर तालुक्यातील मुंजवडी, खानवडी व एखतपूर या तीन गावांमध्ये मोजणीला शुक्रवारपासून सुरुवात करण्यात आलेली आहे. तालुक्यातील तीन गावांमध्ये भूसंपादन समन्वय डॉ. कल्याण पांढरे, पुरंदरच्या उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, त्याचबरोबर भूसंपादन अधिकारी संगीता राजपूर-चौगुले या तीन अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली त्या त्या गावांमध्ये मोजणीची प्रक्रिया सकाळपासून सुरू झालेली.
या तीन गावातील शेतकऱ्यांनी अधिकार्यांसह त्यांच्या पथकांना सहकार्य केले. त्यामुळे दिवसभरात शांततेत 50 हेक्टर जागेची मोजणी झालेली आहे. पुढे आणखी तीन आठवडे ही मोजणीची प्रक्रिया सुरू राहणार आहे व त्या त्या वेळी गरजेनुसार ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आहे.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.