मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक लाभार्थी महिलेला ई-केवायसी बंधनकारक करण्यात आलेले आहे. दोन महिन्याची मुदत यासाठी देण्यात आलेली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी 21 सप्टेंबर रोजी फ्लोचार्ट शेअर केलेला आहे व त्यामध्ये ई-केवायसी करण्याच्या प्रत्येक स्टेप्स सविस्तरपणे सांगितलेले आहेत. तरी देखील अनेक महिला लाभार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. यंदा ई-केवायसी करण्यासाठी पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक बंधनकारक करण्यात आलेला आहे. हा आधार क्रमांक टाकल्यानंतर मोबाईलला आलेला ओटीपी टाकल्यानंतरच पुढची स्टेप पूर्ण होणार आहे. त्यामुळे याबाबत अनेकांना अडचणीना सामोरे जावे लागत आहे.
लाडक्या बहिणींना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे-
- ओटीपी येत नाही किंवा साइटवर लॉगिन करण्यात अडचण येत असेल तर अशा महिलांनी काय करावे?
सुरुवातीला आपला वायफाय किंवा नेटवर्क चेक करून घ्यावे. त्यानंतर चांगले नेटवर्क असेल अशा ठिकाणी ई-केवायसी प्रक्रिया करावी. दुसरी महत्वाची बाब म्हणजे सध्याला लाखोच्या संख्येमध्ये महिला ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती ई-केवायसी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे संकेतस्थळावरती लोड वाढला आहे. त्याचबरोबर वेबसाईटचे काम चालू असल्यामुळे वारंवार एरर येत आहे. त्यामुळे शक्यतो रात्रीच्या वेळी किंवा पाहटेच्या वेळी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. ई-केवायसी करण्यासाठी दोन महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे. या दोन महिन्यांमध्ये कधीही ई-केवायसी करता येणार आहे.
- ई-केवायसी प्रक्रिया कोणी करायची आहे.
ज्या महिलांचा हप्ता बंद झालेला आहे व ज्या महिलांचा हप्ता चालू आहे, अशा सर्व महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
- दोन्ही बाबी प्रमाणित करण्यासाठी होय किंवा नाही कोणता पर्याय निवडावा.
या दोन्ही पर्यायांमध्ये ‘होय’ असे निवडायचे आहे. या ठिकाणी पहिला प्रश्न व्यवस्थित टाकला नसल्यामुळे अनेक महिलांचा याबाबतीत गोंधळ उडालेला आहे.
- बाबी प्रमाणित करत असताना चूकून होयच्या जागी नाही असे झाले असेल तर काय करावे?
आता सध्या तरी यासाठी कोणताही पर्याय उपलब्ध नाही. परंतु काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही दिलेल्या आधार कार्डच्या माध्यमातून ही संपूर्ण माहिती तपासली जाईल.
- E-KYC पूर्ण झाल्यानंतर सबमिट केली आहे. परंतु त्यात पुन्हा काही दुरुस्ती करायची असेल तर कशी करता येईल?
E-KYC चा फॉर्म एकदा सबमिट केल्यानंतर तो सध्यातरी पुन्हा एडिट करता येत नाही.
- एका घरामध्ये तीन महिला असतील तर ई-केवायसी कशी करावी?
शासन निर्णयानुसार प्रत्येक कुटुंबातील एक विवाहित व एक अविवाहीत महिला या योजनेच्या लाभासाठी पात्र असणार आहे. त्यामुळे घरातील फक्त एकच विवाहित व एकाच अविवाहित महिलेने ई-केवायसी करावी. बाकीच्या महिलांनी ई-केवायसी करू नये. जर घरातील सर्वच महिलांनी ई-केवायसी केली तर तुमच्या कुटुंबातील सर्व महिला अपात्र ठरल्या जाणार आहेत.
- ज्या महिलांचे पती व वडिलांचे निधन झालेले आहे, अशा महिलांनी कोणाच्या आधार कार्डवरील नंबर नमूद करावा. किंवा ज्या महिलांचा घटस्फोट झालेला आहे किंवा पतीचं निधन झालेले आहे व या महिलेचे वडीलही हयात नसतील तर अशा महिलांनी कोणाच्या आधार कार्डवरचा क्रमांक ई-केवायसी करताना टाकावा? अशा महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण करावी?
अनेक महिलांकडून अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. परंतु अशा महिलांना काही वेळ वाट पहावी लागणार आहे. लवकरच शासनाकडून याबाबतीमध्ये निर्णय घेतला जाईल.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.