शासनाच्या माध्यमातून बुधवारी बागायत जमीनीचे 10 गुंठे व जिरायत जमिनीचे 20 गुंठ्याच्या खालील क्षेत्राची खरेदी, विक्रीच्या व्यवहारांवरती बंदीचा कायदा रद्द करण्यात आल्याची घोषणा केलेली आहे. यामुळे 1 जानेवारी 2025 पर्यंतच्या एक, दोन, तीन गुंठ्यांच्या भूखंडाची खरेदी विक्री कायदेशीररित्या होणार आहे. याच्या अंमलबजावणीची कार्यप्रणाली पुढील पंधरा दिवसांमध्ये जिल्हा पातळीवर मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात होणार आहे. महसूल मुद्रांक विभाग प्रशासनाकडून असे सांगण्यात आलेले आहे की, या पुढील काळात कमी क्षेत्रातील भूखंडाची खरेदी, विक्री कायदेशीर दृष्ट्या होणार आहे.
तुकड्यांची शेती परवडत नाही व त्यातून अपेक्षित उत्पादन मिळत नाही. म्हणून शासनाने तुकडेबंदीचा कायदा आणला होता. परंतु शहरालगत नागरिकीकरण गतीने वाढत चालले आहे. खेड्यामध्येही गावठाणाबाहेर बांधकामे होतात. यासाठी जमिनीच्या छोट्या भूखंडाची खरेदी, विक्रीचे व्यवहार वाढलेले आहेत. पैशाच्या गरजेपोटी अनेक जणांनी एक, दोन, तीन किंवा पाच गुंठ्यांचे भूखंड विकलेले आहेत. अनेकांनी भविष्यामध्ये घर बांधता येईल म्हणून ते घेतलेले आहे. परंतु, तुकडेबंदी कायद्यामुळे व्यवहार कायदेशीर झाले नाहीत. करार पत्रामध्ये व्यवहाराबद्दलचे कायदेशीर मालकीचे प्रश्न उपस्थित झाल्यामुळे वाद न्यायालयात जाऊ लागले होते.
अशा भूखंडावरती घर बांधण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्ज मिळत नाही. त्याचबरोबर बांधकाम परवाना मिळत नाही. म्हणून तुकडे बंदीचा कायदा रद्द करण्यात यावा, अशी मागणी विधानसभेत आमदारांनी केली होती. त्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तुकडेबंदी कायदा रद्द केला आहे. आता 1 जानेवारी 2025 पर्यंत झालेल्या व्यवहार नियमित करण्यात येणार आहे. त्याचा लाभ जिल्ह्यात किती जणांना होणार आहे, याची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. पंधरा दिवसानंतर या कामाला गती मिळणार आहे.
महापालिका, नगरपालिका कार्य क्षेत्राजवळील क्षेत्र-
तुकडे बंदीतून महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, विकास प्राधिकरणालगतच्या क्षेत्रातील व गावठाणाजवळील 200 ते 500 मीटर पर्यंतचा भाग वगळण्यात आलेला आहे.
भूखंड पाडून विकण्याचा ट्रेंड वाढणार-
तुकडेबंदी रद्द झाल्यामुळे जमिनीचे तुकडे करून म्हणजेच भूखंड पाडून विकण्याचा ट्रेंड वाढणार आहे. यातून बांधकाम व्यवसायाला आणखी चालना मिळणार आहे, असेही काही बांधकाम व्यवसायिकांचे म्हणणे आहे.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.