जमीन खरेदी केल्यानंतर सातबारा उताऱ्यावर प्रत्यक्ष नावे येण्यासाठी नागरिकांना तलाठी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात. या धर्तीवर नोंदणी विभागाची ‘आय सरिता’ व भूमिअभिलेख विभागाची ‘ई-फेरफार’ या दोन संगणक प्रणाली एकमेकांशी जोडण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे दस्त नोंदवल्यानंतर ऑनलाईन फेरफार नोंद घेतली जाणार आहे. या सुविधेमुळे 15 ते 20 दिवसात सातबारा उताऱ्यावर नाव नोंदविले जाणार आहे. हा निर्णय राज्याचा महसूल विभाग, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग व माहिती व तंत्रज्ञान विभागाने एकत्रित येऊन सातबारा उतारा व मिळकत पत्रिकांवर फेरफार नोंदी घेण्याची प्रक्रिया सुटसुटीत व्हावी या उद्देशाने घेतलेला आहे. या प्रणालीच्या माध्यमातून कामकाज अत्यंत सोपे झालेले आहे.
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून दस्त नोंदणीसाठी सध्या ‘आय सरिता’ या संगणक प्रणालीचा वापर करण्यात येतो. या प्रणालीच्या माध्यमातून खरेदी-विक्री, हक्कसोड, बोजा कमी करणे किंवा चढवणे इत्यादी प्रकारांच्या दस्तनोंदणीची सर्व कामे ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतात. दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात दस्त नोंदणी झाली की ऑटो ट्रिगर पद्धतीने जमीन विकणारा व खरेदी करणाऱ्यांची नावे, कुठली जमीन व किती क्षेत्र, दस्तांमध्ये दर्शविण्यात आलेले जमिनीचे मूल्य व हा व्यवहार कधी झालेला आहे इत्यादी सर्व प्रकारच्या माहितीचा मजकूर तयार केला जातो. तो मजकूर महसूल विभागाच्या ई-फेरफार या संगणक प्रणालीला पाठवण्यात येतो. त्यानंतर तलाठी यांच्यामार्फत संबंधितांना नोटीस पाठवली जाते व मंडल अधिकारी यांच्या मंजुरीने नोंद घेतली जाते. त्याचबरोबर नोंदणीची अंमलबजावणी सातबारा उताऱ्यावर आपोआप केली जाते.
तीन संगणकप्रणाली एकमेकांशी संलग्न-
आय सरिता, ई-फेरफार व शहरी भागासाठी ई-पीसीआयसी या तीनही संगणकप्रणाली एकमेकांशी जोडण्यात आलेल्या आहेत. ग्रामीण भागात सातबारा व शहरी भागातील मिळकत पत्रिका उताऱ्यावरील फेरफार नोंदी घेण्याचे काम या माध्यमातून केले जाते.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.