सातबारा उतारा हे शेतीशी निगडित असलेल्या महत्त्वाच्या कागदपत्रांमधील सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे. परंतु संगणकीकृत प्रणालीमध्ये टायपिंग करताना किंवा हस्तलिखित उताऱ्यांचे संगणकीकरण करताना काही चूक होण्याची शक्यता असते. या अशा चुकांमुळे जमिनीच्या नोंदीत तफावत निर्माण होते. त्यामुळे भविष्यात मालकी हक्क, वारसाहक्क किंवा खरेदी-विक्री प्रक्रियेत अडचणी येण्याची शक्यता असते. जर ऑनलाईन सातबारा उतारा व हस्तलिखित सातबारा उताऱ्यात क्षेत्रफळ, क्षेत्राचे एकक, खातेदाराचे नाव किंवा मालकांच्या भागीदारांमध्ये फरक आढळला तर ही दुरुस्ती ऑनलाईन पद्धतीने तलाठी कार्यालयाकडे करता येऊ शकते. चला तर मग सदर लेखातून जाऊन घेऊया याबद्दलची सविस्तर माहिती.
सातबारा उताऱ्यातील चुका कशा दुरुस्त कराव्यात?-
राज्य शासनाने सातबारा दुरुस्ती प्रक्रिया ई-हक्क प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिलेली आहे. यामुळे नागरिकांना तलाठी कार्यालयात वारंवार फेऱ्या मारण्याची गरज नाही.
- सातबारा उताऱ्यावरील चूक दुरुस्त करण्यासाठी सर्वात आगोदर bhumiabhilekh.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवरती जायचे आहे.
- त्यानंतर सातबारा उताऱ्यात आवश्यक दुरुस्तीची माहिती भरण्यासाठी Mutation 7/12 हा पर्याय निवडायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला नोंदणी(Registration) व लॉगिन प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
- जर तुम्ही पहिल्यांदाच अर्ज करत असाल तर bhumiabhilekh.maharashtra.gov.in/Account/Register या अधिकृत लिंकवरती जाऊन नाव, ई-मेल आयडी व मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर पासवर्ड सेट केल्यानंतर Send OTP वर क्लिक करावे. नोंदणी केलेल्या मोबाईल व ई-मेलवर आलेला OTP टाकावा व फॉर्म सबमिट करावा.
- लॉगिन केल्यानंतर सातबारा उताऱ्यात आवश्यक दुरुस्तीची माहिती भरण्यासाठी Mutation 7/12 हा पर्याय निवडायचा आहे. त्यामध्ये दुरुस्ती काय करायची आहे याबाबतची माहिती भरावी व तुमच्या जमिनीचे हस्तलिखित सातबारा उताऱ्याचे स्कॅन केलेले कागदपत्रे अपलोड करावे.
- सर्व माहिती भरून झाल्यानंतर अर्ज हा सबमिट करावा व त्याची प्रिंट काढून घ्यावी. हा अर्ज तलाठी कार्याला सादर करणे गरजेचे आहे.
दुरुस्तीची पुढील प्रक्रिया कशी होते?-
- सातबारा उताऱ्यातील दुरुस्तीची प्रक्रिया तलाठी व तहसीलदार यांच्याकडून केली जाते.
- तलाठी कार्यालयात तुमच्या अर्जाची पडताळणी व कागदपत्रांची तपासणी करण्यात येते.
- जर तहसीलदाराकडून दुरुस्तीची संमती मिळाली तरच ती सातबारा उताऱ्यात नोंदवली जाते.
- काही प्रकरणांमध्ये तहसीलदार तपासणीचे आदेश देखील देतात.
- अर्जदाराला नोटीस बजावली जाते व त्यानंतर अंतिम दुरुस्ती ही केली जाते.
सातबारा उताऱ्यातील दुरुस्ती का महत्वाची-
जर सातबारा उताऱ्यात झालेल्या चुकांची वेळेमध्ये दुरुस्ती केली नाही, तर भविष्यात मालकी हक्का संबंधित अडचणी निर्माण होण्याची दाट शक्यता असते. शासनाकडून सातबारा पुनर्लेखन दर 10 वर्षांनी केले जाते. त्यामुळे जर कोणत्याही खातेदाराचे नाव चुकीने वगळले गेले किंवा एखादा शेरा राहून गेला असेल तर तो कलम 155 च्या अंतर्गत दुरुस्त करण्यात येतो. सातबारा उतारा हा शेतीच्या मालकीसाठी, बँक कर्जासाठी, वारसाहक्काच्या नोंदीसाठी व विविध सरकारी योजनांसाठी गरजेचे दस्ताऐवज आहे. त्यामुळे जर तुमच्या सातबारा उताऱ्यात काही चूक आढळली तर त्याची दुरुस्ती लगेच करून घ्यावी.
सातबारा उताऱ्यातील चूका दुरुस्ती करणे आता सोपे-
तंत्रज्ञानाच्या मदतीने आता सातबारा उताऱ्यातील दुरुस्ती ऑनलाईन करता येते. त्यामुळे नागरिकांना वारंवार सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज भासत नाही. तर तुमच्या सातबारा उताऱ्यात चुकीची माहिती असेल तर ई-हक्क प्रणालीचा वापर करून तुम्ही सहजपणे दुरुस्त करू शकता. त्यामुळे वेळेत सुधारणा करून भविष्यातील अडचणी टाळा.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

