केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या निर्देशानुसार 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या जुन्या वाहनांना “उच्च सुरक्षा क्रमांक पाटी” (हाय सिक्युरिटी नंबर प्लेट- HSRP) बंधनकारक करण्यात आलेली आहे. जर तुम्ही ही नंबर प्लेट नाही लावली तर तुम्हाला आरटीओच्या नियमानुसार जो काही दंड आकारण्यात आलेला आहे तो भरावा लागणार आहे. आता ही नंबर प्लेट तुमच्या टू व्हीलर गाडीला, थ्री व्हीलर गाडीला किंवा फोर व्हीलर गाडीला बसवायची आहे. मार्च 2025 पर्यंत या नंबर प्लेट गाडीवर बसवणे गरजेचे आहे.
कारण त्यानंतर 1 एप्रिल पासून कारवाई करण्यात येऊन दंड आकारण्यास सुरुवात होणार आहे. यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. ही नंबरप्लेट तुम्हाला दोन प्रकारे बसवता येणार आहे. पहिला प्रकार म्हणजे ही नंबरप्लेट तुम्हाला सेंटरवरती जाऊन बसवता येणार आहे व दुसरा प्रकार म्हणजे काही पिनकोड मध्ये तुम्ही होम डिलिव्हरी सुद्धा घेऊ शकता म्हणजेच तुमच्या घरी येऊन सुद्धा तुमच्या गाडीला नंबर प्लेट बसवून देण्यात येते.
हाय सिक्युरिटी नंबर प्लेट म्हणजे काय-
हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ही ॲल्युमिनियमपासून बनवली जाते. तिचा आकार 1.1 मिमी एवढा असतो. तिच्यावर एक होलोग्राम जोडण्यात आला आहे व तो क्रोमियम आधारित आहे. स्टिकरप्रमाणे दिसणाऱ्या होलोग्राममध्ये वाहनांचा सर्व तपशीलाची ऑनलाईन नोंदणी होते. सुरक्षिततेसाठी प्लेटवर एक युनिक लेझर क्रमांक छापला जातो. विशेष म्हणजे ही प्लेट वेगळ्या बनावटी पद्धतीने बनवणे अशक्य आहे. या प्लेटवरील क्रमांक ‘जीपीएस’शी जोडण्यात आलेला आहे. त्यामुळे सध्या स्थिती वाहन कोठे आहे याची माहिती आपल्याला प्राप्त होणार आहे.
प्लेटवर काय नमूद आहे-
प्लेटच्या दर्शनी भागावर डाव्या कोपऱ्यात ‘’IND” ही अक्षरे नमूद असून त्याचा आकार वाहन क्रमांकाचा एक चतुर्थांश ठरवण्यात आलेला आहे. 20 मिमी आकाराचे क्रोमियम आधारित अशोक चक्र आहे. ते हॉट स्टॅम्पिंगद्वारे छापण्यात आलेले आहे. प्लेटसाठी विशेष दहा अकांचा वेगळा क्रमांक देखील देण्यात आलेला आहे. प्लेटवरील मजकूर जास्त होऊ नये म्हणून हे अंक ‘रिफ्लेक्टिव्ह शीट’वर लेझर ब्रँड केले आहेत.
ते प्लेटच्या खाली डाव्या बाजूला प्रकाशित करण्यात आलेले आहेत. या अंकासाठी 5 मिमी जागा निश्चित करण्यात आलेली आहे. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वाहन खरेदी करताना ‘आरटीओ’ नोंदणी प्राधिकरण, वाहनधारकाचे नाव, मोबाईल क्रमांक, इंजिन क्रमांक, वाहन क्रमांक, नाव, पत्ता आदी माहिती संगणकीकृत करण्यात आली आहे.
हाय सिक्युरिटी क्रमांकची प्लेट का लावावी?-
वाहतुकीच्या संदर्भातील गुन्हे केल्यानंतर संबंधितांकडून पळ काढण्यात येतो. त्याचबरोबर वाहन खरेदी विक्रीचा व्यवहार करताना होणारे गैरव्यवहार, गुन्हांमध्ये होणाऱ्या चोरीच्या वाहनांचा वापर, वाहनांच्या पाट्या बद्दल प्रवास याबाबत माहिती मिळवण्यासाठी पोलिसांना भरपूर परिश्रम करावे लागतात. परंतु नवीन अत्याधुनिक क्रमांकाच्या प्लेटमुळे गुन्हांचा मागवा घेण्यास व ते प्रतिबंधित करण्यास मदत मिळणार आहे.
वाहन चोरी झाल्यास जीपीएऐसद्वारे तातडीने माहिती प्राप्त होणार आहे. रस्त्यावर, महामार्गावर कोणत्या वेळेत वाहानांची सर्वाधिक वर्दळ असते. किती वाहनांची ये-जा सुरू असते, त्यामध्ये जड-अवजड वाहनांची संख्या किती याची माहिती देखील प्राप्त होणार आहे. वाहतूक कोंडीवर नियंत्रण तसेच नियोजन करता येणे देखील शक्य होणार आहे, असे वाहतूक तज्ञांकडून सांगितले जात आहे.
नोट-
- HSRP प्लेट ऑनलाईन बुक करण्यासाठी वाहन मालकांनी या https://transport.maharashtra.gov.in/1035/Home अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.