राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौरपंप व शेततळे या योजना राबवण्यात येतात. याचा फायदा हजारो शेतकऱ्यांना झालेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी वर्गाकडून आता याच धर्तीवर ‘मागेल त्याला कांदाचाळ’ ही योजना राबवण्याची मागणी केली जात आहे. बाजारभावात वाढ झाल्यावर साठवलेल्या कांद्याच्या विक्रीतून अधिक फायदा होईल, यामुळे ही योजना सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.
दौंड तालुक्यामध्ये मागील काही वर्षांमध्ये कांदा पिकाच्या लागवडीमध्ये वाढ झालेले आहे. सुरुवातीच्या काळात कांद्याचे बाजार भाव दहा ते पंधरा रुपयांपर्यंत येत असल्याने शेतकरी कांदाचाळी तयार करून कांद्याची साठवणूक करतात. परंतु सगळ्याच शेतकऱ्यांना कांदाचाळ करणे शक्य होत नाही, म्हणून काही शेतकऱ्यांना नाइलाजास्तव कमी बाजारभावात कांदा हा विकावा लागतो. यामुळे उत्पन्नात घट होते.
मागील दोन वर्षापासून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी मागेल त्याला शेततळे व मागील वर्षापासून मागेल त्याला सौर पंप योजना चालू करण्यात आलेल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी तालुका कृषी विभागाच्या वतीने कांदा चाळ योजना सुरू आहे. परंतु त्यात काही अटी आहेत, असे शेतकऱ्यांद्वारे सांगण्यात येत आहे.
अर्ज करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन-
शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर कांदा चाळीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा असे आवाहन दौंड तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने केले जात आहे.
अशी आहे सध्या स्थिती-
- लकी ड्रॉ पद्धतीने कांदा चाळीसाठी शेतकऱ्यांची निवड ही केली जाते.
- शेतकऱ्यांना कांदाचाळीसाठी निवड होण्यासाठी वाट पाहावी लागते.
- गेल्या दोन वर्षांमध्ये कांदा चाळीसाठी लाभार्थ्यांची निवड झालेली नाही.
- सध्या एससी व एसटी प्रवर्गातील लाभार्थ्यांची निवड झालेली आहे.
- साधारणपणे वर्षभरात तालुक्यामधील 50 कांदाचाळी पूर्ण होत आहेत.
- लाभार्थी निवड प्रक्रिया तातडीने होत नाही तसेच अनेक अटी देखील घालण्यात आलेल्या आहेत.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.