आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या लोकांना मोफत आरोग्य सेवा मिळावी यासाठी ‘प्रधानमंत्री आयुष्यमान भारत जन आरोग्य विमा योजना’ राबवण्यात येते. आयुष्यमान भारत योजनेचा लाभ हा फक्त 2011 च्या सामाजिक, आर्थिक व जातीगणनेत म्हणजेच SECC यादीमध्ये नाव असलेल्या कुटुंबांना घेता येत होता. परंतु कुटुंबातल्या सगळ्या वयातल्या सगळ्या सदस्यांसाठी मिळून 5 लाख रुपयांची मर्यादा ठेवण्यात आली होती.पण मागच्या वर्षी या योजनेच्या आधीच असलेल्या कुटुंबातल्या 70 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांसाठी वेगळा 5 लाखाचा ‘टॉप-अप’ म्हणजे जास्तीचा कव्हरेज सुरू करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे ते इतर कुटुंबीयांसोबत शेअर होत नाही. आयुष्यमान भारत आरोग्य योजनेच्या माध्यमातून 70 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांवर मोफत उपचार केला जातो.तसेच या योजनेचा लाभ 4.5 कोटी कुटुंबातील सुमारे 6 कोटी जेष्ठ नागरिकांना होणार आहे. तसेच त्यांच्या कुटुंबाला पाच लाखापर्यंत मोफत इन्शुरन्स कव्हर मिळणार आहे.
केंद्र सरकारने राष्ट्रीय आरोग्य योजनेच्या माध्यमातून आयुष्यमान भारत योजना 2017 साली सुरू केलेली आहे. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून देशभरातील निवडक सरकारी व खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार केला जातो. हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याअगोदर 10 दिवस व नंतरच खर्चासाठी या योजनेमध्ये रिफंडचा नियम आहे. या योजनेच्या माध्यमातून जुने आजारही कव्हर होतात. कोणत्याही आजारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याअगोदर व नंतरचा खर्च यामध्ये कव्हर होतो. तसेच मेडिकल टेस्ट, ऑपरेशन, औषधी इतकंच नाहीतर प्रवासासाठी होणाऱ्या खर्चाचाही यामध्ये समावेश करण्यात येतो. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 5 कोटी पेक्षा जास्त नागरिकांचा उपचार केलेला आहे. ही योजना 70 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या देशातल्या सरसकट नागरिकांसाठी लागू झालेली आहे.त्यासाठी उत्पन्नाची किंवा इतर कोणतीही अट नाही. पण जर एखाद्या कुटुंबामध्ये एकापेक्षा जर अधिक जेष्ठ नागरिक असती किंवा पती-पत्नी असतील तर त्या दोघांमध्ये मिळून 5 लाखाचा मोफत उपचार केला जाणार आहे. त्यामुळे 70 पेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची यादीत कशी नोंद करावी हे आपण सदर लेखातून जाणून घेणार आहोत.
सदर योजनेची अर्ज प्रक्रिया-
- सर्वात अगोदर beneficiary.nha.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जावे.
- तेथील ‘Beneficiary’ हा पर्याय सिलेक्ट करून आवश्यक ती माहिती त्यामध्ये भरावी व कॅप्चा भरून घ्यावा.
- नंतर मोबाईल नंबर टाकून ‘Verify’ या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर ओटीपी येईल. ओटीपी टाकला की परत कॅप्चा टाकावा.
- त्या पेजवर दोन वयस्कर माणसे असणारा एक मोठा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा बॅनर दिसेल. त्या बॅनरमध्ये असणाऱ्या ‘Click here to enroll’ या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर आधार कार्डचा नंबर व कॅप्चा टाकावा.
- या ठिकाणी सामाजिक, आर्थिक व जाती-गणनेनुसार पात्र असणाऱ्या, अगोदर नोंदणी केलेल्या कुटुंबाची माहिती समोर दिसते. परंतु अर्ज करणाऱ्या जेष्ठ नागरिकांची अगोदरपासून नोंद नसेल तर ‘No records found linked to your Aadhar Number. Please click here for fresh enrollment’ असा मजकूर समोर दिसेल. या आधार कार्ड नंबरसोबत कोणतीही नोंद सापडलेली नाही असा त्याचा अर्थ असणार आहे. त्यामुळे नवीन नोंदणी करण्यासाठी आपल्याला निळ्या अक्षरात लिहिलेल्या ’Click here’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तेथे आधार कार्डशी जोडलेल्या फोन नंबरवर ओटीपी येईल. आपण त्या ओटीपीद्वारे e-kyc पडताळणी प्रक्रिया सुरू करू शकता.
- ‘Verify’ या बटणावर क्लिक केल्यानंतर हिंदी व इंग्रजी भाषेतून एक consent form अर्थात सहमती दर्शवण्यासंदर्भातील मजकूर येतो. तो वाचून खाली दिलेल्या बॉक्समध्ये टीक केले की ओटीपी येतो. आधार कार्डशी फोन जोडलेला नसेल तर ही प्रक्रिया पूर्ण होणार नाही.
- या ठिकाणी आपणास दोन ओटीपी येतील. एक आधार कार्डशी जोडलेल्या फोन नंबरवर येईल व दुसरा सगळ्यात पहिल्या पेजवर टाकलेल्या फोन नंबरवर येईल. दोन्ही नंबर एकच असेल तर एकाच मोबाईलवर दोन ओटीपी येतील. ते व्यवस्थित पाहून योग्य त्या जागी टाकावेत.
- त्यानंतर तुमच्यासमोर एक मजकूर स्क्रिनवर दिसेल. त्यामध्ये 70 वर्षापेक्षा जास्त वयाचे असल्याने तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात असे लिहिलेले असेल. शिवाय, सरकारी योजनेची एक यादी तेथेच असेल आणि तुम्ही फायदा घेत असल्यास योजना तुम्हाला निवडावी लागेल.
- आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेचा फायदा घेण्यासाठी तुम्ही अगोदर घेत फायदा घेत असलेल्या योजना तुम्हाला सोडाव्या लागतील. जर कोणत्याही योजनेचा फायदा घेत नसल्यास ‘none of these’ येथे क्लिक करावे व पुढे ‘proceed’ या पर्यायावर क्लिक करा.
- पुढच्या पेजवर तुम्हाला अर्जदाराच्या आधार कार्डमध्ये असलेली सगळी माहिती दिसेल. तेथेच आधार कार्डच्या फोटो शेजारी ’capture photo’ नावाचा एक पर्याय दिसेल. तिथे तुमचा एक फोटो काढून e-kyc पूर्ण करायची आहे.
- त्यानंतर आयुष्यमान भारत कार्डसोबत नोंद करण्यासाठी फोन नंबर टाकावा. फोन नंबरवर पुन्हा एक ओटीपी यईल. तो त्या रकान्यात टाकावा व मोबाईल नंबर ‘verify’ करावा.
- नंतर अर्जदाराची सगळी माहिती भरायची आहे. शेवटी तुमच्या कुटुंबामधील इतर सगळ्या सदस्यांची माहिती विचारली जाईल. त्यामध्ये त्या व्यक्तीचे अर्जदाराशी असलेले नाते, जन्म तारीख, आधार नंबर अशा गोष्टी असतील. कुटुंबातल्या सगळ्या 70 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मिळून एकच कार्ड आहे.
- त्यानंतर ‘submit’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे व आयुष्यमान भारत कार्डसाठीचा फॉर्म हा जमा करण्यात आलेला असेल.
- तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर पुन्हा beneficiary.nha.gov.in या वेबसाईटवर जावे. त्यातील ‘beneficiary’ हा पर्याय निवडावा. तेथे पुन्हा अगोदर सांगितल्याप्रमाणे मोबाईल नंबर टाकून पुढच्या पेजवर जता येते.
- आता या पानावर आधार कार्डचा नंबर टाकल्यावर ‘आयुष्मान भारत वय वंदना कार्ड’ तुम्हाला डाऊनलोड करून घेता येणार आहे.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

