सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा शुभारंभ आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. या अनुदानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हेक्टरी 5 हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत विशेष अनुदान वितरणाचा शुभारंभ आज करण्यात आला.
पहिल्या टप्प्यात सुमारे 2 हजार 399 कोटींचे वाटप-
पहिल्या टप्प्यामध्ये 49 लाख 50 हजार खातेदारांच्या खात्यांत पैसे जमा केले आहेत. सुमारे 96 लाख 787 इतकी राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची संख्या आहे. त्यापैकी पोर्टलवर 68 लाख 6 हजार 923 खात्यांची माहिती भरण्यात आली आहे. तसेच यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधिच्या माहिती सोबत आधार जुळणी व 70 टक्के पर्यंत नावाची पडताळणी झालेल्यांची संख्या 4 लाख 60 हजार 730 इतकी आहे.
याव्यतिरिक्त 17 लाख 53 हजार 130 आधारसंमतीपत्रानुसार माहिती भरलेल्या खात्यांची संख्या आहे. अशारीतीने 49 लाख 50 हजार शेतकऱ्यांच्या 63 लाख 64 हजार खात्यांवर अनुदानाचे अर्थसहाय्य जमा केले जाणार आहे. त्यासाठी 2 हजार 398 कोटी 93 लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच टप्प्याटप्प्याने उरलेल्या शेतकऱ्यांना देखील लाभ वितरित केला जाणार आहे, असे कृषी विभागाने सांगितले आहे.
सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांना 0.2 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1000 रुपये तर 0.2 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5 हजार रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसाह्य देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यानुसार आज पहिल्या टप्प्याचे वितरण करण्यात आलेले आहे.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.