सौर कृषी पंप योजना ही ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध आहे व ज्या शेतकऱ्याकडे शेतीच्या सिंचनासाठी पारंपारिक पद्धतीने वीजपुरवठा नाही अशा शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून राज्यात कृषी पंप बसवण्यात येतात. महाराष्ट्रात 2015 पासून सौर ऊर्जेचे महत्त्व लक्षात घेऊन सौर कृषी पंप योजना राबवल्या जातात. या अगोदर अटल सौर कृषी पंप योजना व मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना राबविण्यात आली होती.
तसेच सद्यस्थितीला प्रधानमंत्री कुसुम घटक-ब योजनेच्या माध्यमातून सौर कृषी पंप बसवण्यात येत आहेत. राज्यातील शेतकऱ्यांचा कृषी पंपाबाबत प्रतिसाद लक्षात घेऊन राज्य शासनाने मागेल त्याला सौर कृषी पंप योजना जाहीर केलेली आहे. ज्या शेतकऱ्याकडे शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध आहे व ज्या ठिकाणी या अगोदर पारंपारिक कृषीपंपसाठी वीजपुरवठा देण्यात आलेला नाही अशा सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
महावितरणकडे पैसे भरून प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना देखील प्राधान्य देण्यात येणार आहे. सौर कृषी पंप योग्यरित्या चालण्यासाठी जेथे सूर्याची किरणे सोलर पॅनलवर पूर्णपणे पडतील म्हणजेच कुठल्याही प्रकारची सावली अथवा अडोसा त्यावर येणार नाही, तसेच पॅनलवर धूळ, घाण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच सोलर पॅनल सूर्यकिरणाच्या दिशेने फिरवण्यास वाव असेल अशा ठिकाणी बसवावा. त्याचबरोबर जमिनीचा भूभागा समपातळीवर असावा. सोलर पॅनल शक्यतो पाण्याच्या स्रोताजवळ व तो सहज स्वच्छ करता येईल अशा ठिकाणी लावावा.
सोलार पंप हा सोलर पॅनलच्या जवळच असला पाहिजे. परंतु ज्या क्षेत्रामध्ये सिंचन करायचे आहे त्या क्षेत्रात असायला हवा. एकदा एका ठिकाणी बसवलेला सौर कृषी पंप परत दुसऱ्या ठिकाणी बसवणे योग्य नाही. लाभार्थी शेतकऱ्यांना सदर कृषी पंप विक्री अथवा हस्तांतरण करण्यास बंदी राहणार आहे. जर लाभार्थी शेतकऱ्यांनी सौर कृषी पंपाची विक्री अथवा हस्तांतरण केल्यास त्याच्याविरुद्ध महावितरण कंपनी यांच्याद्वारे गुन्हा देखील दाखल करण्यात येईल.
सदर योजनेचे ठळक वैशिष्ट्ये-
- ही योजना शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची तसेच स्वतंत्र व शाश्वत योजना आहे.
- या योजनेच्या माध्यमातून सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांना केवळ 10 टक्के रक्कम भरून सौर पॅनल व कृषी पंपाची पूर्ण संच देण्यात येईल.
- जे शेतकरी अनुसूचित जाती-जमातीचे आहेत त्या लाभार्थी शेतकऱ्यांना फक्त 5 टक्के रक्कम भरून सौर कृषी पंपाचा पूर्ण संच देण्यात येईल.
- उरलेले रक्कम केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान म्हणून देण्यात येईल.
- जमिनीच्या क्षेत्रानुसार 3 ते 7.5 एचपी पर्यंत पंप देण्यात येतो.
- तसेच त्याबरोबर इन्शुरन्स सह पाच वर्षाची दुरुस्ती हमी देण्यात येणार आहे.
- या कृषी पंपामुळे विज बिल नाही, लोडशेडिंगची चिंता नाही.
- या सौर कृषी पंपामुळे सिंचनासाठी दिवसभर वीज पुरवठा मिळतो.
सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे –
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- सातबारा
- आठ अ उतारा
- फोटो
- बँक पासबुक
सदर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा-
या योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला महाऊर्जा या वेबसाईटवरती जायचे आहे. पोर्टल ओपन झाल्यानंतर ‘लाभार्थी सुविधा’ या मुख्य मेनूमध्ये ‘अर्ज करा’ यावरती क्लिक करावे व आवश्यक तो तपाशिल भरावा. लाभार्थी अर्जदाराने ऑनलाईन अर्ज सादर करताच अर्जदारास मोबाईल क्रमांकावर लाभार्थी क्रमांक व इतर तपशील एसएमएसद्वारे कळविण्यात येतील. त्याचबरोबर अर्जदारास विविध टप्प्यावर अर्जाची स्थिती देखील मोबाईल क्रमांकवर एसएमएसद्वारे कळविण्यात येईल.
तसेच अर्जदारास वेबपोर्टलवर जाऊन लाभार्थी क्रमांकाच्या आधारे अर्जाची सद्यस्थिती देखील बघता येईल. अर्ज करण्यासाठी अडचण येत असेल तर महावितरणाच्या तालुका स्तरावरील उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा. याशिवाय महावितरणाच्या मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राशी संपर्क साधावा किंवा महावितरणाच्या मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राशी संपर्क साधावा. यासाठी महावितरणाचे टोल फ्री क्रमांक 1800-233-3435 किंवा 1800-212-3435 उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

