शेतकऱ्यांना दुधाचे अनुदान कधी मिळणार? या बाबतीतील बातमी सकाळमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर अवघ्या पाच दिवसामध्येच अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील साई प्रसाद दूध प्रकल्पातील 513 व इंदापूर तालुक्यातील श्रीराम दूध प्रकल्पातील 69 अशा एकूण 582 शेतकऱ्यांच्या खातात 14 लाख 96 हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात आलेले आहे.
पुणे जिल्ह्यातील दूध प्रकल्पांकडून अनुदानाचे प्रस्ताव सादर होत नसल्यामुळे दुधाचे अनुदान रखडले होते. दोन महिने उलटून देखील एकाही शेतकऱ्याला दुधाचे अनुदान मिळाले नव्हते. 114 खाजगी व सहकारी दूध प्रकल्पांपैकी फक्त 4 दूध प्रकल्पांनी अनुदानासाठीचे प्रस्ताव सादर केले होते. त्या आकड्यात आता वाढ होऊन तो आकडा 18 वर पोहोचला आहे. तरी अजून देखील 96 दूध प्रकल्पांनी अनुदानासाठी माहिती शासनाला दिलेली नाही.
राज्य सरकारच्या माध्यमातून दुधाला 3.5 फॅट व 8.5 एसएनएफला 30 रुपये दर जाहीर करण्यात आलेला आहे, 1 लिटरला 5 रुपये अनुदानाची घोषणा 1 जुलै 2024 पासून देण्याची घोषणा केलेली आहे. परंतु दोन महिने उलटून देखील अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. अनुदानासाठी 114 प्रकल्पांपैकी 4 दूध प्रकल्पांचे अनुदानासाठी प्रस्ताव सादर झालेले आहेत.
अशी माहिती 5 सप्टेंबर रोजी सकाळमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर सरकारला जाग आली व ज्या दूध प्रकल्पांनी अनुदानबाबत माहिती देण्यास विलंब केला त्यांनी देखील माहिती भरण्यास सुरुवात केली आहे. शिरुर तालुक्यातील साई प्रसाद दूध प्रकल्पातील 513 दूध उत्पादक शेतकऱ्यांना 11 लाख 71 हजार रुपये, तर इंदापूरमधील श्रीराम दूध प्रकल्पातील 69 दूध उत्पादकांना 3 लाख 25 हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करावा. तसेच जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करावी.

