चालू स्थितीला उन्हामुळे दुधाच्या दरात 30% घट झालेली दिसून येत आहे. त्याचबरोबर पाणी टंचाई, चाऱ्याचा प्रश्न व पशुखाद्याचे वाढते दर या सर्व कारणांमुळे दूध उत्पादक शेतकरी हा त्रस्त झाला आहे. काही दिवसांपूर्वी दोन रुपये वाढवलेले गाईच्या दुधाचे दर बहुतांश दूध संघाने पुन्हा दोन रुपये कमी केले आहेत.
त्यामुळे 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ असलेल्या गाईच्या दुधाला प्रति लिटर 29 रुपयाचा दर हा पुन्हा आता 27 रुपयांवर आला आहे. दूध उत्पादकांना दोन रुपये दर कमी केल्यापासून दर दिवसाला तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक तर शासनाने नियुक्त केलेल्या समितीच्या शिफारशीनुसार 34 रुपये दर दिला जात नसल्याने प्रति लिटरला सात रुपयाप्रमाणे दररोज 15 कोटी रुपयांपेक्षा अधिक फटका बसत असल्याने दूध उत्पादक शेतकरी परेशान झाले आहेत.
दोन ते सव्वा दोन कोटी लिटर पर्यंत राज्यात गाईच्या दुधाचे संकलन होत असते. कमी पाणी उपलब्धता असलेल्या भागातील शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय करतात. नगर, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाडा तसेच विदर्भासह अन्य भागात खूप जास्त उष्णता आहे.
उष्णता ही तीव्र असल्याने बहुतांश भागात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम हा दूध व्यवसायावर होताना दिसत आहे. मागील वर्षी या दिवसात दुधाला 35 रुपयांच्या आसपास प्रति लिटरला दर होता. परंतु यंदा सात ते आठ महिन्यापासून सातत्याने खरेदीदार दुधाचे दर कमी करत आहेत.
दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या आंदोलनानंतर शासनाने समिती नियुक्त करून 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ असलेल्या गाईच्या दुधाला किमान 34 रुपये प्रति लिटर दर द्यावा याबाबतची शिफारस केली होती. परंतु त्याच्याकडे पशुसंवर्धन विभागाने दुर्लक्ष केले आहे. मागील काही दिवसांपूर्वी गाईच्या दुधाला 25 रुपये प्रति लिटर दर मिळत होता.
त्यानंतर दीड महिन्या अगोदर तो 27 रुपये केला व 11 मे ला 2 रुपयांनी त्यात वाढ केली. परंतु पुन्हा 25 मे पासून 2 रुपयांनी दर कमी केला आहे. त्यामुळे सध्या 29 रुपयापर्यंत पोहोचलेल्या दुधाचे दर आता परत 27 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. दुधाला जो दर मिळत आहे तो कमी आहे.
त्यात दूध व दुग्धजन्य पदार्थाला मागणी नसल्याचे कारण पुढे करत खरेदीदार दूध संघाकडून दुधाचे दर पाडले जात आहे त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अतिशय त्रस्त झाले आहे. या सर्व कारणांमुळे दूध धंदा शेतकरी तोट्यात करत आहेत. मागील सहा महिन्याचा विचार केला तर कोट्यावधी रुपयांचा फटका हा दूध उत्पादकांना सोसावा लागला आहे.
जनावरे जगवण्यासाठी कसरत –
राज्यातील 25 जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यावर कोणतीच उपाय योजना नाही. दुष्काळी भागात यंदा छावण्या सुरु केल्या गेल्या नाहीत. तसेच चारा डेपोही उभारले गेले नाहीत.
त्याऐवजी चारा उत्पादन करण्यावर भर दिला. परंतु राज्यातील अनेक भागात चारा, जनावरांसाठी पिण्याची पाणी मिळवताना दूध उत्पादकांची तारेवरची कसरत सुरू आहे, असे असतानाही दुधाचे दर पाडून दूध व्यवसाय उध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.